Aurangzeb Tomb : संपूर्ण हिंदुस्तानावर राज्य करण्याचा मानस असलेल्या औरंगजेबाचं स्वप्न मराठ्यांनी पूर्ण होऊ दिलं नाही. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराज महाराज यांनी औरंगजेबाला कडवी लढत दिली. दख्खन जिंकण्याचं स्वप्न घेऊन आलेला औरंगजेब १७०७ मध्ये मरण पावला. ३७ वर्षे तो महाराष्ट्रात होता. पण महाराष्ट्रानं त्याच्यासमोर शरणागती पत्करली नाही. अखेर याच महाराष्ट्रात औरंगजेबाला मरण आलं आणि इथेच त्याची कबर खणली गेली. दिल्ली मुघल साम्राज्याची राजधानी होती. मग औरंगजेबाची कबर दिल्लीपासून ११५० किलोमीटर दूर असलेल्या महाराष्ट्रातील खुलताबादमध्ये का? त्याच्या कबरीवर सब्जाचं रोप असण्याचं कारण काय?, असे प्रश्न आजही अनेकांना पडतात. यामागे असलेली कहाणी महत्त्वाची आहे.
औरंगजेबाचा मकबरा अतिशय साध्या पद्धतीनं तयार करण्यात आला आहे. इथे केवळ माती आहे. मकबरा एका साधारण पांढऱ्या चादरीनं झाकण्यात आलेला आहे. कबरीवर सब्जाचं रोप आहे. माझा मकबरा अतिशय साधा असावा, असं औरंगजेब सांगून गेला होता. कबरीवर सब्जाचं रोपटं असावं आणि त्यावर छत नसावं, अशीही त्याची इच्छा होती. या मकबऱ्याजवळ एक दगड आहे. त्यावर औरंगजेबाचं पूर्ण नाव अब्दुल मुजफ्फर मुहीउद्दीन औरंगजेब आलमगीर लिहिलेलं आहे. औरंगजेबाचा जन्म ३ नोव्हेंबर १६१८ मध्ये दाहोदमध्ये झाला. तर ३ मार्च १७०७ रोजी तो अहिल्या नगरात मरण पावला.
औरंगजेबानं त्याच्या आयुष्यातील जळपास ३७ वर्षे औरंगाबादमध्ये घालवली. त्यामुळेच त्याला या जागेबद्दल विशेष ममत्त्व होतं. त्याच्या बेगमची कबरदेखील औरंगाबादमध्येच आहे. ती बिबी का मकबरा नावानं प्रसिद्ध आहे. औरंगजेबाच्या पीरची कबरदेखील इथेच आहे. भारतात मला कुठेही मरण आलं, तरी माझा मृतदेह सुफी संत जैनुद्दीन शिराजीच्या कबरीजवळ दफन करावा, अशी औरंगजेबाची इच्छा होती. औरंगजेब आयुष्यभर दख्खनमध्ये लढत राहिला. याच संघर्षात १७०७ मध्ये त्याचा मृत्यू झाला. नगरमध्ये त्याला मरण आलं. त्याच्या मृत्यूनंतर त्याचा मृतदेह खुलताबादला आणण्यात आला. 'माझ्या मृत्यूनंतर माझा मृतदेह माझे गुरु सुफी संत सैय्यद जैनुद्दीन यांच्या जवळच दफन करण्यात यावा,' अशी इच्छा औरंगजेबानं मृत्यूपत्रात लिहून ठेवली होती. जैनुद्दीनचा मृत्यू औरंगजेबाच्या निधनाच्या अनेक वर्षे आधी झाला होता. 'मी जितका पैसा माझ्या मेहनतीनं कमावला आहे, तोच पैसा माझ्या मकबऱ्याच्या उभारणीसाठी वापरण्यात यावा. माझ्या कबरीवर सब्जाचं लहानसं रोप असावं,' असं औरंगजेबानं मृत्यूपत्रात लिहिलं होतं.
हे जरूर वाचा:- dudhsagar trek : दूधसागर के आसपास की ये चमत्कारिक जगहें आपको अवश्य देखनी चाहिए
औरंगजेब त्याच्या वैयक्तिक खर्चासाठी टोप्या शिवायचा. त्यानं कुरान शरीफ ग्रंथ हातानं लिहिला होता. धर्माच्या बाबतीत तो अतिशय कट्टर होता. त्यानं दरबारात संगीतावर बंदी आणली होती. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा आजम शाहनं खुलताबादमध्ये त्याचा मकबरा बांधला. औरंगजेबाच्या इच्छेनुसार, त्याचा मृतदेह सैय्यद जैनुद्दीन सिराज यांच्या जवळ दफन करण्यात आला. मुघल बादशाहांचे मकबरे भव्यदिव्य असतात. त्याभोवती मोठी सुरक्षा असते. पण औरंगजेबाचा मकबरा लाकडाचा आहे. १९०४-०५ मध्ये लॉर्ड कर्जन इथे आले होते. तेव्हा त्यांनी मकबऱ्याच्या चारही बाजूंनी संगमरवराचं ग्रिल उभारलं. कबरीची डागडुजी केली.
जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर खाली दिलेल्या बटणाद्वारे Whats App आणि Facebook, Twitter वर आपल्या मित्र, नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. जेणेकरून त्यांनाही याची माहिती मिळू शकेल.