Kandi Pedha : साताराच्या कंदी पेड्यांची एक मजेदार गोष्ट आहे. आपल्याकडे गोऱ्या साहेबांनी जवळ जवळ १५० वर्षें राज्य केले. या लोकांमध्ये स्थानिक बोली भाषा, चालीरीती , राहणीमान तसेच खाद्य पदार्थ यात समरस होण्याची प्रचंड इच्छा शक्ती होती. त्यांच्या या इच्छा शक्तीतूनच "साताऱ्याच्या कंदी पेढे " यांचे नामकरण झाले.
गोष्ट सातारी कंदी पे़ढ्यांची ….
ही गोष्ट आहे तब्बल दीडशे वर्षापूर्वीची…!
भारतात ब्रिटीश राजवट सुरु होती. साताऱ्यात छत्रपतींच्या संस्थानावर देखील ब्रिटीश प्रतिनिधी बसवण्यात आले होते. हे अधिकारी इंग्लंडवरून आलेले होते. त्यांना गोड खाण्याची सवय होती. मग ते कायम वेगवगेळ्या मिठाईच्या शोधात असायचे.
सातारा जिल्ह्यातील जो पाटणकडचा डोंगराळ भाग आहे तिथे त्याकाळात शेतीचं प्रमाण कमी होतं. लोकांच उपजीविकेचं साधन मुख्यसाधन हे पशुधन होतं. तिथल्या गायी म्हैशीचं वैशिष्ट्य म्हणजे त्या रानावनात वाढलेल्या होत्या. विकतचा चारा हा प्रकार तिथे नव्हता. यामुळे त्यांचं दुध घट्ट आणि अस्सल असायचं. शिवाय ते मुबलक प्रमाणात उपलब्ध होतं. हे दुध जवळच मोठं शहर म्हणून सातारला पाठवून दिलं जायचं.
काहींनी या दुधाला कढईत उकळून त्यात साखर किंवा गुळ टाकली. हे मिश्रण घट्ट झाल्यावर त्याचे छोटे छोटे गोळे बनवले. ते एका करंडीमध्ये भरून ब्रिटीश अधिकाऱ्यांना पेश केले. ब्रिटीशांना ही मिठाई प्रचंड आवडली.
यातूनच जन्म झाला कंदी पेढ्याचा … !
तर तो कसा ? हा प्रश्न आपोआप मान वर काढतो.
तर पुढील कथा अशी आहे की, त्यांना "करंडी" म्हणता येत नसल्यामुळे त्यांनी त्याला "कँडी" म्हणायला सुरवात केली. पुढे याच कँडीचं आपल्या सातारकरांनी "कंदी" केलं.
हे जरूर वाचा:- Underbody Coating : कारला अंडरबॉडी कोटिंगचे लावण्याचे गुप्त फायदे! गंजाबरोबरच या भयानक समस्यांपासूनही ठेवेल तुमच्या गाडीला सुरक्षित!
पुढची कथा पण रोचक आहे.
साधारण याच काळात छत्रपतींच्या नवव्या वंशजानी महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील खडकलाट या गावातून काही मिठाई बनवणाऱ्या कुटुंबाना साताऱ्यात आणून वसवलं होतं. त्यांनी बनवलेले कंदी पेढे लोकप्रिय होत गेले. पुढे त्यांनाच लाटकर अस ओळखलं जाऊ लागलं.
कंदी पेढ्याला सातासमुद्रापार नेलं ते मात्र तुळजाराम मोदी या हलवायांनी….!
त्यांनी सत्तर वर्षापूर्वी विमानात, लंडनमधील सुप्रसिद्ध ठिकाणी या कंदी पेढ्यांच्या जाहिराती लावल्या. त्यामुळेच हा पेढा कानाकोपऱ्यात पोहचला. आजही एवढ्या वर्षांनी एवढी तंत्रज्ञानात सुधारणा होऊनदेखील मोदी आणि लाटकर हलवाई मात्र कंदी पेढ्याचा खवा आजही कढईतच भाजतात व प्रत्येक पेढा हातावरच वळला जातो. खव्याची भाजणी विशिष्ट प्रकारे केल्यामुळे पेढ्याची पौष्टिकता, चव व टिकाऊपणा वाढतो. म्हणूनच गेली १५० वर्ष सातारच्या कंदी पेढ्यांची चव आणि गुणवत्ता तशीच टिकून आहे.
भारतात अनेक ठिकाणचे पेढे प्रसिद्ध आहेत. पेढ्याची जन्मभूमीच मथुरा ही आहे. उत्तरेतून ठाकूर राम रतन सिंह यांनी हे पेढे दक्षिणेत धारवाड येथे आणले. त्यांना धारवाडी पेढे म्हणून ओळखलं जात.
हे जरूर वाचा:- Baby Girl Names in Marathi Starting with J : आपल्या बाळाच्या भविष्यासाठी अर्थपूर्ण व अद्वितीय नाव निवडा
महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणचे पेढे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. यात कोल्हापूरचे फिक्के पेढे, कुंथलगिरीचे पेढे, वाडीचे पेढे, राजूर खावा पेढे (अहमदनगर), चांदवड औषधी पेढे ( नाशिक ) व खूप काही असे पेढ्यांचे नामकरण झालेले आहे. मात्र इतर पेढ्यांच्या तुलनेत सातारचे पेढे हे खवा जास्त भाजल्यामुळे भुरकट दिसतात. कमी साखर हे या पेढ्याचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. परिणामी हा पेढा सहा ते आठ दिवस सहज टिकतो.
सातारच्या कंदी पेढ्याची सिक्रेट रेसिपी म्हणजे हे पेढे डबल भाजलेले आहेत, हे पेढे सह्याद्रीतल्या रानातला चारा खाणाऱ्या गाई म्हैशीपासून बनलेले आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथल्या पेढ्यांमध्ये सातारच्या माणसांचा "प्रेम" मिक्स झालाय.
या सगळ्या मुळे सातारच्या कंदी पेढ्याचा ब्रँड जगात फेमस झालाय.
तर अशी आहे, गोष्ट सातारी कंदी पे़ढ्यांची ….
जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर खाली दिलेल्या बटणाद्वारे Whats App आणि Facebook, Twitter वर आपल्या मित्र, नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. जेणेकरून त्यांनाही याची माहिती मिळू शकेल.
Read Also,