Rohit Sharma Centuries : आयपीएल 2025 मध्ये गुरूवारी मुंबई आणि हैदराबाद यांच्यात वानखेडे स्टेडियमवर सामना रंगला. या सामन्यामध्ये क्रिकेट चाहत्यांच्या नजरा रोहित शर्मावर खिळल्या होत्या, कारण या संपूर्ण मोसमात रोहितची बॅट शांत आहे. हैदराबादविरुद्धच्या सामन्यातही रोहितला मोठी खेळी करता आली नाही, पण रोहित जेवढा वेळ क्रीजवर होता तेवढा वेळ त्याने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. इम्पॅक्ट सब म्हणून बॅटिंगला आलेल्या रोहितने 16 बॉलमध्ये 26 रन केले, ज्यात 3 सिक्सचा समावेश होता.
रोहितने त्याच्या या छोट्या खेळीमध्येही मोठा विक्रम केला आहे. आयपीएलमध्ये वानखेडे स्टेडियमवर 100 सिक्स मारण्याचा विक्रम रोहितने केला आहे. रोहितने आयपीएलमध्ये वानखेडे स्टेडियमवर आतापर्यंत 102 सिक्स मारल्या आहेत. याचसोबत आयपीएलमध्ये एकाच मैदानावर 100 किंवा त्यापेक्षा जास्त सिक्स मारणाऱ्या खेळाडूंमध्ये रोहित चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
हे जरूर वाचा:- D Gukesh : The Youngest world Chess Champion Gukesh की सफलता का रहस्य.
रोहित शर्माआधी विराट कोहली, क्रिस गेल आणि एबी डिव्हिलियर्स यांनी आयपीएलमध्ये असा विक्रम केला आहे. कोहली-एबी आणि गेलने बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये सिक्सचं शतक झळकवालं आहे. कोहलीने चिन्नास्वामी स्टेडियममध्ये आतापर्यंत 130 सिक्स मारले आहेत. तर गेलने 127 आणि डिव्हिलियर्सने 118 सिक्स मारले.
आयपीएलच्या या मोसमात रोहित शर्मा बहुतेक सामने इम्पॅक्ट सब म्हणून खेळला आहे. रोहितने 6 सामन्यांमध्ये 13.66 च्या सरासरीने 82 रन केले आहेत. या मोसमात रोहितला मोठी खेळी करण्यात यश आलं नाही, त्यामुळे या मोसमात मुंबईला एकाही सामन्यात धमाकेदार सुरूवात करता आलेली नाही.